fbpx
Aug 1, 2019
592 Views
1 0

“खोगीरभरती”..गरज की आपत्ती ?

Written by

भारतीय जनता पक्ष हा देशातील, कदाचित जगातील सगळ्यात मोठा राजकीय पक्ष आहे. पण तो आताच गेल्या काही वर्षांत झालेला आहे.१९८० साली स्थापन झालेल्या पक्षाला देशात पूर्ण बहुमत मिळायला ३४ वर्षे लागली. यापूर्वी जनसंघ अस्तित्वात होता तो कालावधी मिळवला तर एकूण ६३ वर्षे होतात.

तळागाळातील कार्यकर्त्यांपासून पंतप्रधानपदापर्यंत या पक्षाची शिस्तबद्ध रचना आहे. संघटनेची ध्येयधोरणे ठरवण्याचे अधिकार कोणाला द्यायचे हे निश्चित केलेले आहे. बाहेरच्या पक्षातून आलेला कुणीही थेट संघटनेची ध्येयधोरणे ठरवेल इतक्या महत्त्वाच्या पदाला सहजासहजी पोचत नाही. एक वेळ त्याला आमदारकीचे, खासदारकीचे तिकीट मिळेल,मंत्रिपद मिळेल परंतु पक्षाचे ध्येयधोरण ठरवण्यात त्यांचा सहभाग इतक्या सहजी असत नाही.

पक्षाच्या मूळ विचारधारेशी एकनिष्ठ असलेल्या व्यक्तीलाच पक्षाची ध्येय धोरणे ठरवण्याचा अधिकार प्राप्त होतो.

राष्ट्रीय स्तरावरच्या कोणत्याही राजकीय पक्षाला स्वतःचा विस्तार करणे हे महत्त्वाचे वाटते.फूटप्रिंट वाढवणे असे त्याला म्हणतात.ज्या राज्यात अस्तित्व शून्य आहे तिथे कार्यकर्त्यांचे जाळे उभे करून निवडणुकीत यश संपादन करणे हे खूपच कठीण काम असते.अशा वेळी राजकीय परिस्थिती जर अनुकूल असेल तर पक्षाकडे इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांचा ओढा असतो.जनमानसातही स्थान पक्के होत असते. अशा वेळी दुसऱ्या पक्षातील नेते,कार्यकर्ते जर पक्षात आले तर त्यांना प्रवेश देऊन चालत नाही.

जे राज्याबाबत तेच एखाद्या राज्यातील एखाद्या प्रदेशाबाबत.समजा तिथे पक्षाचा जोर नसेल तर अस्तित्व निर्माण करणे, टीम उभारणे आणि निवडणूक जिंकण्यासाठी रचना तयार करणे हे प्रथम कर्तव्य समजले जाते

गेल्या वर्षी त्रिपुरामध्ये मिळालेला दणदणीत विजय हे याचे उत्तम उदाहरण आहे. ज्या राज्यात अस्तित्वच नव्हते तिथे स्वबळावर बहुमत मिळाले याचे कारण काय आहे ? एकतर परिस्थिती अनुकूल होती,त्या परिस्थितीचा फायदा उठवण्यात पक्ष नेतृत्व यशस्वी ठरले,मेहनत करून संघटन बांधले हे खरे परंतु इतक्या संख्येने कार्यकर्ते तिथे नव्याने निर्माण करणे हे अशक्य होते.जितके शक्य होते तितके नक्कीच केले.अनेक तरुणांना राजकारणात आणले आणि कार्यकर्ते म्हणून काम करायला लावले परंतु त्याच बरोबर इतर पक्षातून आलेले कार्यकर्ते होते, नेतेही होते. तेथील विजय हा या सगळ्याचा एकत्रित परिणाम होता.

थोड्याफार फरकाने लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्येही तसेच झाले आहे. बिल्कुल अस्तित्व नसलेले ते राज्य आता हळूहळू ताब्यात येऊ शकेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बंगालमध्येही इतर पक्षांचे अनेक नेते आणि कार्यकर्ते भाजपमध्ये येत आहेत त्यांना नाही म्हणणे म्हणजे पक्षवाढीच्या, संभाव्य विजयाच्या मार्गात अडथळा निर्माण करण्यासारखे आहे.

देशाच्या नकाशावर जर एक नजर टाकली तर पश्चिम बंगाल,ओरिसा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू आणि केरळ ही सगळी किनाऱ्यावरील राज्ये आहेत आणि इथे भाजपला बिलकुल कुठेही स्थान नाही. जर खऱ्या अर्थाने राष्ट्रीय पक्ष म्हणून कायमस्वरुपी स्थान भक्कम करायचे असेल तर हा कच्चा दुवा आहे.तिथे स्थान मिळवण्यासाठी इतर पक्षातील नेत्यांना नाही म्हणून चालणार नाही

महाराष्ट्रात सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत.काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षातून अनेक नेते भाजपमध्ये येत आहेत.त्यामुळे येथील वातावरण ढवळून निघत आहे.अनेक समर्थकच जोरदार टीका करू लागले आहेत. ईडीची किंवा इतर कोणतीही चौकशी सुरू असलेल्या कुणालाही पक्षात घेणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी निःसंदिग्ध शब्दांत सांगितले आहे.विरोधी पक्षातील सर्व आमदार येणार नाहीत असेही सांगितले आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही

एक प्रश्न नेहमी विचारला जातो की इतर पक्षातील कार्यकर्ते आले तर विद्यमान कार्यकर्त्यांनी काय करायचे, त्यांचे महत्त्व कमी होईल की नाही होणार .इतर काही प्रश्न म्हणजे दुसऱ्या पक्षातील आलेल्या नेत्यांमुळे भाजप भ्रष्ट होईल का ? पक्षाला कीड लागेल का?पक्षाची वाताहात होईल का?

याबद्दल मला असे म्हणायचे आहे की जोपर्यंत वेगळ्या विचारसरणीचे लोक पक्षात घेऊन पक्षाची ध्येयधोरणे ठरवण्यात ढवळाढवळ करत नाहीत तोपर्यंत याची चिंता नाही. प्रदेश कार्यकारिणी,राष्ट्रीय कार्यकारिणी, संसदीय मंडळ इथे फक्त पक्षाच्या मुख्य विचारधारेशी निष्ठावंत असलेले नेतेच असतात हे जुन्या कार्यकर्त्यांनी आणि सामान्य जनतेने लक्षात घेणे आवश्यक आहे

मुद्दा उरतो जुने कार्यकर्ते दुःखी होतील याचा.भाजप १९८० साली स्थापन झाला. तेंव्हापासून आजपर्यंत भाजपला महाराष्ट्रात बहुमतासाठी आवश्यक असा १४४ सीट्सचा पल्ला स्वबळावर गाठता आलेला नाही हे कटू सत्य आहे. राजकीय पक्षांचे मुख्य उद्दिष्ट सत्ता प्राप्त करणे असते.कायम विरोधात बसून आपली ध्येयधोरणे कशी राबवणार?

नवीन भरतीमुळे कार्यकर्ते दुःखी होतील असे जर कोणी म्हणत असेल तर एकामागोमाग एक निवडणुका हरून कोणते सुख त्यांना मिळत होते आणि मिळेल ?

नेतृत्व जर तरुण,तडफदार,निष्कलंक आणि कार्यक्षम असेल तर त्यावर पूर्णपणे विश्वास ठेवायला हवा.त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.

पक्षात खोगीरभरती होते आहे ती राजकीय गरज आहे आपत्ती नाही.

आनंद विश्वनाथन

Share This
 •  
 • 361
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  361
  Shares
Article Tags:
· ·

Leave a Reply

MENU