fbpx
Feb 18, 2019
1198 Views
12 1

तरुण इंजिनिअरची सियाचीनमधील कामगिरी!

Written by

भारतीय सैन्याने केलेला पराक्रम असो वा नुकताच घडलेला दुर्दैवी प्रसंग असो; भारतात सैन्यदलांच्या बद्दल अभिमानाची व आदराची लाट येते. तसे होणे स्वाभाविकही आहेच. सीमांवर दक्ष असणारे व नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रसंगी सर्वोच्च बलिदान देणारे जवान हे सर्वांच्याच आदराचा व अभिमानाचा विषय ठरतात. पण अनेकदा ही लाट क्षणिक असते. ती ओसरली की शिस्तीसारखी साधी गोष्टही नागरिकांच्या कडून अंगिकारली जात नाही. रस्त्यावरचे रहदारीचे नियम पाळण्याचा आग्रह असेल, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेबाबतचे नियम पाळणे असेल, समयपालन असेल वा एक-दुसऱ्या बद्दल एक नागरिक म्हणून सन्मानाची वागणूक असेल अशा अनेक आघाड्यांवर, भावनेची लाट ओसरताच, एक नागरिक वर्ग म्हणून आपण लगेचच ‘मूळ पदावर’ येतो असा अनुभव आहे. ह्याला अपवाद अर्थातच असतात अशाच एका सन्माननीय अपवादाची गोष्ट. नाव सुधीर मुतालिक. पेशा इंजिनिअर. 

काश्मीर-लडाखच्या पर्वतरांगात सियाचीन नावाच्या हिमनदीवर जगातले सर्वोच्च रणांगण आहे. समुद्र सपाटीपासून १८८५० फूट इतक्या उंचीपर्यंत पसरलेल्या ह्या हिमनदीवर भारतीय सैन्य-तळ आहे. तेथे सुमारे १००० जवान असतात. ऐन थंडीत तापमान -५० अंश सेल्सियस इतके खाली जाते. अशा ठिकाणी रॉकेल हे त्या तळाचे जीवन आहे. शेकोटी, स्वयंपाक, कपडे धुण्याचे यंत्र, स्नो स्कूटरचे इंधन, प्रकाश मिळवणे अशा विविध कामांसाठी तिथे रॉकेल सतत लागते. जिथपर्यंत रस्ता आहे तिथपर्यंत रॉकेलचे बॅरल ट्रक्स मधून न्यायचे व पुढे प्रत्यक्ष सियाचीनच्या तळावर ते हेलिकॉप्टर मधून टाकायचे अशी पद्धत आजवर रॉकेलच्या वाहतुकी साठी वापरली जायची. सियाचीन संबंधीच्या काही लेखातून, वृत्तांतातून सुधीर मुतालिक यांच्या हे निदर्शनास आले. ही गोष्ट आहे १९९७ मधली. म्हणजे कारगिल युद्धाच्या सुमाराची. सुधीर मुतालिक तरुण होते, इंजीनिअर होते. विशिष्ट प्रकारचे पंप्स व पंपिंग सिस्टम्स संबंधी त्यांचा नुकताच सुरु झालेला व्यवसाय होता. त्याच्या मनात आले की आपण ह्या प्रश्नावर काही मार्ग सुचवू शकतो का?

मनात आलेला मार्ग ढोबळमानाने असा होता की योग्य प्रकारचे पंप्स व पाईप्स यांच्या माध्यमातून रॉकेल सियाचीनवर पोहोचवायचे. पण हे करण्यात अडथळे काही कमी नव्हते. सर्वात महत्वाचे म्हणजे जिथे ही फ्लुइड ट्रान्स्फर सिस्टीम उभी करायची तिथे वीज नव्हती. म्हणजे विजेवर चालणारे कुठलेच उपकरण/ यंत्र उपयोगी होऊ शकत नव्हते. दुसरे म्हणजे प्रचंड थंडीत व ऋण तापमानात ही यंत्रणा चालली पाहिजे. जिथपर्यंत रॉकेलचे बॅरल ट्रक्स मधून उतरवले जातात तिथपासून काही किलोमीटर अंतरापर्यंत रॉकेल वाहून नेण्याचे पाईप्स टाकणे हे देखील आव्हानाचे काम होते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे एक नुकताच व्यवसाय सुरु केलेला तरुण इंजीनिअर हे नक्की करून दाखवेल असा विश्वास सैन्याला वाटणे!

भरपूर प्रश्नोत्तरे, विविध पातळ्यांवर मुलाखती, प्रकल्पाची चिकित्सा व काही फील्ड ट्रायल झाल्या आणि ह्या तरुण इंजिनिअरच्या कौशल्यावर व कर्तृत्वावर सैन्यातील अधिकाऱ्यांनी विश्वास दाखवला. १९९७ मध्ये सुधीर व त्याच्या टीमने काम सुरु केले. १९९८ अखेरीस सुरुवातीला दोन स्पेशल पंप्स फिल्डवर बसवले गेले व काही महिन्यात प्रकल्प वेगाने पूर्ण झाला. एक पंप दर तासाला २०० लिटर केरोसीन दोन-अडीच किलोमीटर अंतरावर पाईपाद्वारे पोहोचवायचा. दर दोन-अडीच किलोमीटर वर असे पंपिंग स्टेशन उभारायचे अशी योजना सैन्याने स्वीकारली व त्याची कार्यवाही झाली. प्रकल्प यशस्वी झाला. सैन्यदलांचे अधिकारी अत्यंत खुश होते. एक तर रॉकेल पोहोचणे अधिक खात्रीने होणार होते. दुसरे म्हणजे हेलिकॉप्टरने रॉकेलचे बॅरल टाकणे खर्चिक काम होते. दिवसाला एक कोटी रुपये इतका खर्च अशा वेळी यायचा. आणखी महत्वाचे म्हणजे सैन्यदलांना त्यांच्या हेलिकॉप्टरचा उपयोग अधिक उपयुक्त कामांसाठी करता येऊ लागला. एक प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर सुधीरच्या कंपनीने सैन्यदलांच्या अन्य प्रकल्पांवरही गेल्या वीस वर्षात उत्पादने व सेवा पुरवल्या आहेत.

सैन्यासाठी एक नागरिक सातत्यपूर्ण काम करत कशी सेवा देऊ शकतो त्याचे सुधीर, त्याची टीम आणि त्याची कंपनी हे एक आदर्श उदाहरण आहे. अशा विविध मार्गाने विविध प्रसंगी सैन्याला अश्या अनेक सेवा व उत्पादने गुणवत्तापूर्ण प्रकारे नागरिक देऊ शकतात. निदान जे सैनिक आपल्यासाठी खडतर परिस्थितीत जीवाचे रान करत आहेत त्यांच्या त्यागाला व कष्टांना साजेसा व्यवहार व शिस्तपालन एक नागरिक म्हणून आपला असणे हाच खऱ्या अर्थाने आपल्या शूर जवानांबद्दल आदरभाव दाखवण्याचा मार्ग आहे. वीस वर्षांपूर्वी काही मोजक्या मित्रांना माहित असलेले सुधीरचे कर्तृत्व आजच्या परिस्थितीत तरुणांच्या समोर यावे म्हणून हे जाहीर लिहिण्याला सुधीरने मान्यता दिली आहे. त्याच्या ह्या आदर्शवत कृतीतून अनेक सुधीर निर्माण होतील असा विश्वास आहे.

-हिरण्य सूर्यवंशी

Share This
 •  
 • 1.1K
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  1.1K
  Shares

Leave a Reply

MENU