fbpx
Aug 17, 2019
397 Views
0 0

विंचवाचे बिर्‍हाड पाठीवर

Written by

ऊसतोडणी कामगार, छपरांवर डांबर लावणारे, बांधकाम मजूर आदी मंडळींना आपण आधुनिक `भटके विमुक्तम्हणून संबोधू शकतो. जिथे काम असेल तिथे जायचे, काम करायचे, पैसे घ्यायचे आणि काम संपले की नव्या ठिकाणी जाऊन डेरा टाकायचा, हा यांचा जीवनक्रम! `विंचवाचे बिर्‍हाड पाठीवरही उक्ती अगदी सार्थ करणारी त्यांची जीवनशैली असते. जेवढे दिवस कामधंदा असेल तेवढे आणि तेवढेच दिवस त्या ठिकाणी थांबायचे, ही त्यांची पद्धत! स्वाभाविकच तुम्हाआम्हाला आयुष्यात ज्या गोष्टी `कायमस्वरूपीहव्या असतात त्यांची या मंडळींकडे कायमच वानवा असते. पक्के आणि हक्काचे घर, नियमित नोकरी/धंदा, मुलांना शिक्षण, झालेच तर रेशनकार्ड, जन्मदाखला, आधारकार्ड आदी किमान बाबींचीसुद्धा त्यांच्याकडे बोंबच असते. (पॅनकार्डची तर कल्पनाही करू नका!) अंगात ताकद असेल तोपर्यंत काम करायचे, एवढेच त्यांना माहीत असते. गात्र थकली, त्राण कमी झाले की मग काय करायचे, याचा विचारच त्यांच्या डोक्यात नसतो. काम असले की दिवसाला पाचशे ते हजारभर रुपयेसुद्धा त्यांना कमाई होते. परंतु असे कामाचे दिवस वर्षाला किती असतील याचा मात्र काहीच भरवसा नसतो. स्वाभाविकच `आजचा दिवस ढकलणेएवढेच त्यांना माहीत असते. भविष्याचा विचार करण्याची उसंतच त्यांना मिळत नाही.

ऐकून आश्चर्य वाटेल की अशा बांधकाम मजुरांसाठी सरकारने ठोस योजना तयार केल्या आहेत. या मंडळींनी केवळ आपली नोंदणी जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयात केली तरी त्यांना तब्बल 5 हजार रुपयांचे सामानाचे कीट मिळते. त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी भरघोस शिष्यवृत्ती मिळते, मुलींच्या लग्नासाठी पैसे मिळतात, मुलगी शिकत असेल तर अधिकच लाभ मिळतो, मुले महाविद्यालयात शिकत असतील तर आणखी जास्त पैसे मिळतात. आईवडील ज्या परिस्थितीत जगले त्यातून मुलांना बाहेर काढण्यासाठी सरकार सर्वतोपरि प्रयत्न करीत असते. बांधकाम क्षेत्रात काम करणारे, गवंडी, सुतार, लोहार, प्लंबर, इलेक्ट्रीशियन, ओझी वाहणारे अशा सगळ्यांना या योजनांचा लाभ मिळू शकतो. मात्र, दुर्दैवाने या योजना एक तर या बांधकाम मजुरांपर्यंत पोहोचतच नाहीत किंवा काही आपमतलबी एजंटामार्फत त्या योजना पोहोचतात. हे एजंट मग या मजुरांना एकत्र करतात आणि त्यांना सांगतात, तुम्हाला आम्ही तीन  हजार रुपयांचे सामान मिळवून देतो. बिचार्‍्या निरक्षर मजुरांना तीसुद्धा पर्वणीच वाटते. त्या तीन हजारांच्या सामानात ते खुश होतात आणि एजंट आणि त्यांची वरपर्यंत पोहोचलेली साखळी तर आनंदीच असते!

मात्र, समाजात काहीजण असेही असतात, जे नि:स्वार्थीपणे अशा `नाहीरेगटातील समाजघटकांसाठी काम करीत असतात. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे राहणारा विकास गाडीलोहार हा असाच नि:स्वार्थी भावनेने काम करणारा तरूण. या बांधकाम मजुरांसाठी असणारी योजना त्याने तब्बल सुमारे वर्षभर परिश्रम करून जवळपास साडेचारशे मजुरांना मिळवून दिली. अर्थात, या मजुरांची नोंदणी संबंधिक कार्यालयात केली तरी काम भागत नाही. त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी आणखी बरेच काही करावे लागते. कधी मजूर वेळेवर येत नाहीत तर कधी सरकारी कर्मचारी उपस्थित नसतात, कधी कागदपत्रे पूर्ण नसतात, कधी नोंदणीसाठीचे अगदी 85 रुपयेदेखील या मजुरांजवळ नसतात. पण ते सर्व सव्यापसव्य विकास करीत असतो. वेळ पडली तर स्वत:च्या खिशात हात घालून तो प्रत्येकी 85 रुपये भरतो.

पाचोरा तालुक्यात तडवीभिल्ल, भोई, वडार, लोहार आदी उपजातींचे लोक बांधकाम मजूर म्हणून काम करतात. विकास नियमितपणे या सार्‍या मंडळींकडे पोहोचतो. त्यांना योजनांचे फायदे समजावून सांगतो. त्यांचे अर्ज भरून घेतो. ते जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयात दाखल करतो आणि अखेरीस या मजुरांना प्रत्यक्ष लाभ मिळेल याची खात्री करून घेतो. आजवर सुमारे सव्वादोनशे मजुरांना त्याने असा लाभ मिळवून दिला आहे. बांधकाम साहित्य असलेली पेटी हातात पडली की या कामगारांचे चेहरे ज्या कुतूहलमिश्रीत आश्चर्याने फुलून येतात ते नुसते पाहिले तरी आपले सगळे श्रम सार्थकी लागल्याची भावना मनात येते, असे विकास सांगतो. या समाधानासाठीच त्याचा हा सारा अट्टहास असतो.

विशेष सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन महाराष्ट्राच्या खेडोपाडी आणि शहरांमध्ये शेकडो तरूण या बांधकाम मजुरांना या योजनांचा लाभ मिळवून देत आहेत. सरकारच्या प्रयत्नांमध्ये आपलीही योगदानाची ओंजळ अर्पण करीत आहेत. या मजुरांच्या चेहेर्‍यावर फुलणारे निर्मळ हास्य हेच या सगळ्यांच्या श्रमांचे मोल आहे!

स्वानंद विष्णु ओक

Share This
 •  
 • 423
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
 •  
  423
  Shares

Leave a Reply

MENU